🎉 Up To 10% Off For Cart Value Of Rs 500+* | Minimum Cart Value Accepted Is ₹ 250

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – अभियानाची ओळख

प्रस्तावना :-

वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा नावाने ओळखला जातो. राष्ट्पिता महात्मा गांधी व विनोभा भावे यांच्या पावन स्पर्शाने प्रेरित असून गांधी विचाराने या भूमीत ग्रामविकासाकरिता बचत गटाची चळवळ उमेदच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवीत आहे. गाधीजींच्या गावाकडे चला या विचाराने प्रेरित होऊन आणि गावांचा विकास हे उदिष्ट उराशी बाळगून शासनाने विविध विभाग ग्रामविकासासाठी कार्यरत आहे. वर्धा जिल्ह्यात दारिद्य निर्मुलन व महिला सक्षमीकरणाचे काम स्वर्णजयंती ग्राम रोजगार निर्मिती (SGSY) या योजने माध्यमातून झालेली होती. महिला बचत गटाच्या चळवळी करिता जिल्हा हा सुरवातीपासून होम ग्रोन मॉडेल म्हणून कार्यरत आहे. २००९ पासून वर्धा जिल्ह्यात स्वयं सहाय्यता गटाचे काम चालू आहे. परंतु या योजनेतील त्रुटीची पूर्तता करण्याकरिता शासनाने, उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरवात २०११ पासून केली व २०१३ पासून उमेद अभियानाचे वर्धा जिल्ह्यात स्वतंत्र समर्पित अशी स्वतंत्र यंत्रणा तयार करून सक्षमपणे काम चालू आहे. ज्यामध्ये जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, यांच्याद्वारे प्रत्यक्षरित्या गावस्तरावर उमेद अभियाना अंतर्गत सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी, क्षमता बांधणी, आर्थिक समावेशन, उपजीविकेचे नवनवीन संसाधने वापर करण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या उपजीविका वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्यांचे हक्क व अधिकार त्यांना मिळून देण्यासाठी प्रयत्नरत आहे.

उमेद अभियानाच्या विद्यमाने महिला सक्षमीकरणाचा उमेदच्या यशस्वीतेचे व कार्याचे योगदान या माध्यमातून राबविण्यात येत आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याकरिता उमेद च्या माध्यमातून विशेष प्रयन्त केले जात आहे. स्वयं सहाय्यता समूहाच्या छताखाली आज च्या घडीला 97 टक्के कुटुंब उमेद अभियानात समाविष्ट झालेले आहेत. गरीब गरजू व गरजवंत स्त्रियांना प्रेरणा देण्याबरोबरच रोजगाराचे साधन उपलब्ध करून प्रयत्न होत आहे. 97 टक्के सामजिक समावेशन (saturation) चे उदिष्ट गाठणारा वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.. वर्धा जिल्ह्यातील वर्धीनी महाराष्ट्राचे अभिमान आहेत. वर्धा जिल्ह्यातील वर्धिनी जिल्हा पुरतेच मर्यादित न राहता शेजारी इतरही जिल्ह्यांमध्ये जाऊन स्वयंसहाय्यता चळवळ मजबूत करण्यात मोलाचे योगदान देत आहे. त्यांच्याद्वारे इतर जिल्ह्यात १५ ते ४५ दिवसाची फेरी करून स्वयं सहाय्यता गट तयार करणे व महिला सक्षमीकरण करून महिलांना समूहात जोडण्याचे काम यशश्वीरित्या करीत आहे. तसेच अभियानाच्या विविध विषयामध्ये काम करण्याकरिता गावस्तरावर विविध स्वरूपाचे जसे कि समुदाय संसाधन व्यक्ती, कृषी सखी, पशुसखी, बँक सखी, CTC, मस्त्य सखी, आर्थिक साक्षरता सखी,उद्योग सखी,अश्या विविध समुदायात काम करणाऱ्या महिलांना ग्रामीण जीवनाची दोरी त्यांच्या हातात सुपूर्द करून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न करीत आहे.

वर्धा जिल्हातील बचत गटाच्याचळवळीचा आलेख बघता एकूण वर्धा जिल्ह्यात १४३०९ स्वयं सहाय्यता गट असून १.५५ लाख ग्रामीण महिला समाविष्ट आहे. त्यापैकी कमीत कमी ७ हजार बचतगटाचे सामुहिक व व्ययक्तिक वेगवेगळे उद्योग आहे. वर्धा जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता गटाद्वारे विविध वेगवेगळे उत्पादने निर्मित करीत आहे. ज्यामध्ये टेराकोटा ज्वेलरी, खादी बॅग, खादी कापड, विविध खाद्य पदार्थ, विविध उद्योग, सोलर प्लेट, led बल्ब,लाखडी घाणीचे तेल व इतरही नाविन्यपूर्ण अश्या विविध गोष्टी तयार करून महिला आपल्या उपजीविका साठी काम करीत आहे. अश्या विविध पद्धतीने महिला स्वतः मधील बदल घडवून आणत असून महिला सक्षमरित्या आपल्या पायावर उभ्या होत आहे. गावामध्ये गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ अश्या त्रिस्तरीय पद्धतीच्या संस्था तयार करून गाव विकासामध्ये सहभाग नोंदवीत आहे. हेच या कार्यक्रमाचे यश आहे. अभियानातील उपक्रम :-

१. सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : वर्धा जिल्ह्यात स्वर्ण ग्राम जयंती स्वयंरोजगार योजने अंतर्गत गावस्तरावर NGO यांच्या माध्यमातून महिलांना गटात आणण्यासाठी गाव सभा घेण्यात येत होत्या. व गट निर्मिती करण्यात येत होते. परंतु जिल्हा प्रशासन यांनी NGO काम थांबवून गटातीलच काही महिला गण प्रभागानुसार निवड करून वर्धा जिल्ह्यात संघटिका पद तयार करण्यात आले. व त्यांच्या माध्यमातून महिलांचे गट तयार करण्यात येत होते. सन २०१३ पासून उमेद अंतर्गत अभियानाच्या उद्दिष्टांनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील एक महिला उमेद अभियानाशी जोडण्यात करिता गाव स्तरावर विविध सभा,वार्ड सभा घेऊन महिलांना गटा समाविष्ट करण्याकरिता प्रयन्त करण्यात आलेले आहे. यामध्ये गटातीलच महिला गटाकरिता काम करण्यात इच्छुक अश्या महिलांची निवड करून समुदाय संसाधन व्यक्ती तयार करण्यात आल्या. त्यांना विविध प्रशिक्षणे देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्यात आली. त्यांच्याद्वारे गावस्तरावर समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) यांच्या मार्फत प्रत्यक्षरित्या महिलांना मार्गदर्शन करून स्वयं सहाय्यता गटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. व १० ते १५ बचत गट मिळून एका ग्रामसंघाची स्थापन करण्यात आलेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आवशक्यता नुसार १ किवा २ ग्रामसंघ तयार करण्यात आले असून सर्व ग्रामसंघ मिळून प्रभाग स्तरावर एक प्रभाग संघ तयार करण्यात आलेला आहे. अश्या प्रकारे वर्धा जिल्ह्यात उमेद्ची त्रिस्तरीय रचना गावस्तरावर कार्यरत असून उमेद चे काम बळकट करण्याकरिता या रचनेची मोठी मदत झालेली आहे. या रचणेद्वारे होणारे आर्थिक व्यवस्थापन ,सामाजिक विविध विषयाची माहिती व होणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता गाव स्तरावर विविध समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभाग व्यवस्थापक ,प्रभाग समन्वयक यांच्याद्वारे तसेच तालुका अभियान व्यवस्थापक कक्षद्वारे या सर्व संस्थेवर नियंत्रण ठेवल्या जात आहे. वर्धा जिल्ह्यात हि चळवळ उतरोतर कशी प्रगती करेल याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त उर्वरित महिलांना गटात समविष्ट करून स्वयं सहाय्यता गटाची चळवळ कक्षा कशी रुंदावता येईल यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जात आहे.

२. आर्थिक समावेशन : उमेद अंतर्गत तयार झालेल्या गटांना आर्थिक पाठबळ निर्माण करण्याकरिता शासनाद्वारे विविध उपाय योजना करण्यात येत आहे. याकरिता तालुका स्तरावर कार्यरत तालुका व्यवस्थापक –आर्थिक समावेशन यांच्या अंतर्गत कार्यरत बँकसखी,आर्थिक साक्षरता सखी यांच्या मार्फत गावस्तरावर नियमित मार्गदर्शन करण्यात येत असून महिलांना बँक कर्ज,सामाजीक सुरक्षा योजना, बँकेत होणारे व्यवहार या करिता नियमित मार्गदर्शन व सहकार्य करीत आहे. त्यांच्या माध्यमातून महिलांना गटाचे बँक कर्ज प्रस्ताव तयार करणे. बँकेला,गटाला नियमित भेट देणे व त्यांना बँक व्यवहार शिकविणे. या पद्धतीचे कामे आर्थिक समावेशन अंतर्गत करण्यात येत आहे. महिला गटांना आर्थिक पाठबळ निर्माण करण्याकरिता शासनाद्वारे रु १५०० प्रमाणे खेळते भांडवल (RF) तसेच ग्रामसेवा संघांना रु. ३ ते ५ लक्ष पर्यंत CIF देण्यात येत आहे. तसेच स्वयं सहाय्यता गटातील महिलांना आर्थिक समावेशन अंतर्गत गटाच्या योग्यतेनुसार शासकीय व अशासकीय बँकेकडून बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सन २०२२-२३ मध्ये वर्धा जिल्ह्यात ९३०० स्वयं सहाय्यता महिला बचत गटाकरिता रु. २६२३७.४३ कोटी एवढा बँक कर्ज निधी वितरीत करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्हा या मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये ९० % कर्ज राष्ट्रीयकृत बँकेद्वारे केले जात असून महिलांना योग्य पद्धतीने कर्ज पुरवठा होत आहे. ज्या महिला गट नियमित कर्ज परतफेड करित आहे. त्यांना सुमतीबाई सुकळीकरण योजने अंतर्गत ० टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध होत आहे. ३ टक्के राज्य शासनाकडून व ४ टक्के केंद्राकडून एकूण ७ टक्के व्याज रक्कम माफ करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील जे महिला बचत गट नियमित कर्ज घेत आहे. त्याचे ९९ टक्के कर्ज परतफेड दिसून येत आहे. या सर्व बाबीकरिता गावस्तरावर काम करणाऱ्या बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी, समुदाय स्तरीय वसुली समिती व तालुका व्यवस्थापक – आर्थिक समावेशन संपूर्ण तालुका व जिल्हा टीमद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांच्या उपजीविका अश्या वाढविता येईल हे त्यामागचे उदिष्ट आहे.

३. उपजीविका : वर्धा जिल्हांतर्गत स्वयं सहाय्यता गटातील ज्या महिला व गट शेती व बिगर शेती अशा उपक्रमामध्ये ज्या महिला काम करू इच्छितात त्यांना विविध स्वरूपाचे माहिती व मार्गदर्शन देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्यात येत आहे. त्यांच्या मध्ये असलेल्या कलाकौशल्य यांना वाव देऊन विविध स्वरूपाचे उपजीविकेचे साधने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यांना योग्य पद्धतीने अभियाना अंतर्गत संपूर्ण योजनेची माहिती देऊन त्यांच्या करिता विविध क्षमता बांधणी प्रशिक्षणे आयोजन करून ज्या महिला ज्या पद्धतीचे व्यवसाय करण्यास इच्छुक असेल तश्या स्वरूपाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन त्यांना करण्यात येत आहे. ज्या महिला अन्न सुरक्षा संबधित कार्य करीत आहेत त्यांच्या करिता विविध प्रशिक्षणे तालुका व जिल्हा स्तरावर तसेच जिल्ह्याबाहेर सुद्धा प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. पॅकजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग तसेच विविध स्वरूपाचे गावस्तरावर उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात येत आहे, याकरिता गावस्तरावर कृषी सखी, पशु सखी, CAM, CLM ई. समुदाय संसाधन व्यक्ती यांचे मार्फत प्रत्यक्षरित्या गावस्तरावर काम चालू आहे. तसेच गाव स्तरावर काम करणरे काही समुदाय संसाधन व्यक्ती प्रशिक्षक म्हणून कार्य करीत आहे.

विशेष उपक्रम :

१) वर्धिनी विक्री केंद्र: वर्धा जिल्ह्यात स्वर्ण ग्राम जयंती पासूनच गटाची चळवळ वर्धा जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे चालू होती. बचत गटाच्या चळवळीला अधिक चालना मिळावी याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी मा.अनुपकुमार यादव,तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मा. गुंजन किन्नु व तत्कालीन प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मा. लीना बनसोड यांच्या द्वारे विशेष प्रयत्न चालू होते. याच काळात गटाची बांधणी व महिला सक्षमीकरणचे काम चालू होते. परंतु महिलांनसाठी अजून काही तरी करावे या उदेशाने उपजीविकेवर काम करण्यास सुरवात केली. याला महिलांचा साथ मिळू लागला त्यामुळे गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कुठे तरी दालन मिळावे या करिता जिल्हा परिषद अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला. २००९ मध्ये सदर प्रस्ताव नियामक मंडळ सभेमध्ये पारित करण्यात आला. वर्धा शहरातील वर्धिनी ब्रंड वस्तूचे विक्री केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हा परिषद मालकीचे दुकान गाळे मगनसंग्रालय समोर बॅचलर रोड या ठिकाणी असून वर्धिनी विक्री केंद्रासाठी मागणी करण्यात आलेली होती. याकरिता ५ लाख रु मंजूर करून दुकानाची पुनर्बांधणी करण्यात आली. या वर्धिनी ब्रंडमुळे गट निर्मित वस्तूंना एक दालन मिळाले. या ठिकाणी विविध गावातील गटाद्वारे निर्मित वस्तूं मिळू लागल्या व इतर प्रदर्शनीमध्ये पण जाऊ लागल्या यामुळे वर्धा जिल्हाचे नाव लौकिक झाले. वर्धा जिह्यातील वर्धिनी ब्रंड २००९ मध्ये मा.प्रकल्प संचालक लीना बन्सोड यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यात विकसित करण्यात आला. गटाचे उत्पादन विक्री करिता दालन उपलब्ध करून देण्याकरिता वर्धिनी विक्री केंद्र सुरु करण्यात आले. याद्वारे जिल्ह्यातील विविध गट आपले उत्पादने विक्रीस नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले. सन २०१३ पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध स्वयं सहायता गट मोठ्या प्रमाणात होऊ लागली व उद्योजक महिला तयार होऊ लागल्या. घरगुती खाद्य पदार्थ तसेच घरगुती वापरायच्या वस्तू व इतर वस्तू तयार करू लागल्या व त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सन २०१६ ला वर्धिनी विक्री केंद्राचे कार्यकारिणी तयार करून वर्धिनी सेवा संघ या नावाने नोंदणी करण्यात आली. जिल्हयामध्ये कार्यरत उद्योगशील स्वयं साह्यता गट व उद्योगशील महिला करिता त्याच्या उत्पादित माल योग्य पद्धतीने कसा तयार करता येईल व त्यांना राज्यात व राज्याबाहेर आपला माल गुणवत्तापूर्वक कसा नेता येईल या करिता राज्य स्तरावरून व जिल्हा स्तरावून विविध प्रशिक्षणे व प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या परिस्थीत या वर्धिनी अंतर्गत १६८ प्रकारची उत्पादनाची विक्री वर्धिनी या ब्रंड खाली विक्री करण्यात येत आहे. या माध्यमातून प्रोडक्ट या ठिकाणाहून जिल्ह्यात व जिल्हाबाहेर गटाच्या विविध वस्तू विक्री केल्या जातात. विविध जिल्हा ,राज्य प्रदर्शनीमध्ये सहभागी होऊन उत्पादने विक्री करण्यात येत होती. परंतु गटांना योग्य मार्केट मिळावे या करिता जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष वर्धा द्वारे प्रयत्न करण्यात आलेल असून वर्धिनी ब्रंड चे ५२ उत्पादने अॅमेझान वर विक्रीस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणा वरून वर्धिनी सेवा संघाचे काम चालू होते तेथील गाळे हे देखभाल दुरस्ती साठी आलेले होते. ती जागा कमी पडत असून त्याची दुरस्ती होणे गरजेचे होते. त्या करिता जिल्हा परिषद यांना वारंवार सूचित करण्यात येत होते. तसेच त्या गाळयामागील १५ बाय २५ फुट जागा शिल्लक असून ती मिळण्याकरिता मागणी करण्यात येत होती. सदर जागा हि शिक्षण विभाग जिल्हा परिषदची असून ती कोणत्याही उपयोगाची नव्हती हि संधी साधून जागेची मागणी जिल्हा परिषद अंतर्गत पैश्याची व बांधकामाची तरतूद करण्यात यावी या करिता मागणी करण्यात आली. सध्या स्थितीत वर्धिनी विक्री केंद्र ज्या ठिकाणी चालू होते ती इमारत मोडकळीस आलेली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावरून जिल्हापरिषद मा.अध्यक्ष, मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सहमतीने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत वर्धिनी विक्री केंद्र यांना नवीन इमारत बांधकाम करण्याकरिता मागणी करण्यात आली व जिल्हा नियोजन समिती द्वारे एकूण ६०.८४००/- लक्ष रु चा प्रस्ताव सादर करण्यात आला. व जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी,वर्धा यांच्याद्वारे या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली व जि.प. बांधकाम विभागाकडून बांधकाम पूर्ण करून घेण्यात आले. यामुळे महिलांना महिलांद्वारे उत्पादित वस्तूचे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. सदर वास्तूचे मा. पालकमंत्री श्री.सुधीर केदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व महिलांना त्यांच्या उत्पादित केलेल्या वस्तूच्या विक्रीचे हक्काचे दालन उपलब्ध करून देण्यात आले. हा वर्धा जिल्ह्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. स्वयं सहाय्यता समुहांनी एकूण १६७ प्रकारची उत्पादने विकसित केली असून ५५४२ स्वयं सहायता समूह बिगर शेती क्षेत्रात काम करीत आहे. स्वयं सहायता समूहाचे उत्पादन विकण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर विक्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व उत्पादने वर्धिनी विक्री केंद्र या जिल्हा स्तरावरील विक्री केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहेत, तसेच स्वयं सहायता समूहाने तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अभियानामार्फत विविध प्रदर्शनांचे आयोजन व विविध प्रदर्शनीमध्ये पाठविण्यात येते. सद्यस्थितीत ॲमेझॉनवर ५२ GeM पोर्टलवर ९ उत्पादनांची नोंद करण्यात आलेली आहे यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत आहे. तसेच आर्वी व हिंगणघाट येथे नव्याने तालुका स्तरावर वर्धिनी विक्री केंद बांधकाम करण्यात येत आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयं सहाय्यता महिला बचत गटातील महिला सक्षमीकरणाकरिता व स्वयं पूर्ण करण्याकरिता वर्धा जिल्ह्यात विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामध्ये त्यांची उपजीविका वाढविण्यासाठी विविध स्वरुपात जिल्हास्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे.

२. ग्राम उद्यमिता केंद्र : उमेद अंतर्गत वर्धा जिल्ह्यात स्वयं सहाय्यता महिला बचत गटाकरिता मोठ्या स्वरुपात चळवळ चालू असून जे गट किंवा व्यक्ती उत्पादने तयार करीत आहे. त्यांच्याकरिता योग्य दालन व जागेचा अभाव असल्यामुळे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संकल्पनेतून ग्राम उद्यमिता केद्र निर्माण करण्यात येत आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यात असणारे एकूण ५२० ग्रामपंचायती मध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत द्वारे जागा उपलब्ध करून देण्यात येत असून जिल्हा परिषद नरेगा विभागांतर्गत १००० चौ. फुट जागेमध्ये बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे महिलांना एक गावस्तरावर हक्काचे व्यासपीठ तयार होणार आहे त्यामध्ये महिला स्वतःचे व गटाचे उत्पादने तयार करून विक्री सुद्धा करण्यात येणार आहे. तसेच त्याचा उपयोग इतर स्वयं सहाय्यता महिलांद्वारे करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यात ग्राम उद्यमिता केंद्र हि संकल्पना नव्याने तयार करण्यात आलेली आहे त्याकरिता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेद्वारे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे .या योजनेचा मुख्य उदेश असा आहे कि, महिलांना त्यांच्या हक्काचे दालन मिळावे व त्यांनी त्याच्या उपजीविकेसाठी स्वतंत्ररित्या प्रयत्न करावे.

३. उत्पादनाचे पॅकजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग : उमेद वर्धा अंतर्गत स्वयं सहाय्यता समुहांतील महिलांना उद्योजक होण्याकरिता विशेष भर देण्यात आलेला आहे. त्यांना उद्योजक होण्याकरिता ज्या ज्या प्रशिक्षणाची गरज आहे, ती पूर्ण करण्यात येत आहे. त्यामध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण,व्यवस्थापन, पॅकेजिंग ब्रंडीग,मार्केटिंग, इत्यादी बाबत नियमित प्रशिक्षण देण्यात येत आहे. उमेद अभियाना अंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये विशेष करून २००९ पासून महिलांच्या उत्पादनाला वाव देण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहे त्याकरिता वर्धा जिल्ह्यात वर्धिनी हा ब्रँड तयार करण्यात आलेला आहे. स्वयं सहाय्यता महिला बचत गटामध्ये निर्मित केलेल्या वस्तूच्या विक्रीकरिता वर्धिनी विक्री केंद्र, सुपर मार्ट तयार करण्यात आलेले आहे. याकरिता नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष निधी देण्यात आलेला आहे, तसेच नवीन व जुने उद्योग करणारे व्यावसायिक महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळण्याकरिता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संकल्पनेतून आय आय एम नागपूर येथे उत्पादन करीत असलेल्या गटातील महिला व कर्मचारी यांच्याकरिता माहे जून २०२३ ला दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना योग्य ते व्यवसाय कसा करावा व पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग या सर्व विषयाची माहिती मिळाली. या प्रशिक्षण दरम्यान उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी मास्टर ट्रेनर म्हणून कार्य करायचे आहे व इतर गटांना याची माहिती व प्रशिक्षणे आयोजित करावयाची आहे. या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात प्रभाग स्तरावर विक्री केंद्र तयार करून जिल्हा, तालुका स्तरीय कमिटी तयार करून त्यांच्या माध्यमातून उत्पादित मालाला मार्केट कसे उपलब्ध करून देण्यात येईल याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात वर्धिनी विक्री केंद्र शहरामध्ये चालू असून त्याद्वारे विविध उत्पादनाचे मार्केटिंग करण्यात येत आहे. व हिंगणघाट व आर्वी तालुका येथे नव्याने वर्धिनी विक्री केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. त्या माध्यमातून हिंगणघाट व समुद्रपूर येथील स्वयं सहाय्यता महिलांना त्याचा फायदा करून घेता येईल. तसेच आर्वी येथे आर्वी, आष्टी आणि कारंजा या तीन ठिकाणातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना विक्रीचे दालन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या ठिकाणी विक्री करण्यास असणारे उत्पादने योग्य पॅकेजिंग, ब्रँडिंग करून मार्केटिंग करिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

४. फार्मर प्रोड्युसर कंपनी (FPO) : वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण १४३०९ स्वयं सहाय्यता समूह निर्माण करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामसंघ ९२० व प्रभागसंघ ४९ तयार करण्यात आलेले आहे. याद्वारे गावस्तरावर विविध शेतकऱ्यासोबत काम चालू आहे. त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात महिला शेतकरी काम करीत होत्या त्याकरिता राज्य शासनाच्या आदेशानुसार नवी उमेद फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये गावस्तरावर काम करणाऱ्या कृषीसखी, कृषी प्रभाग व्यवस्थापक (CAM) यांच्या द्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्याला गृह भेटी देऊन सोयाबीन, गहू, चना खरेदी करण्याकरिता वारंवार भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना मालाची पतवारी करणे, मालाची किमती करून माल खरेदी करणे सुरु आहे. त्यामुळे गावातील शेतकरी यांना गावातच माल विक्रीला वाव मिळाला असल्यामुळे त्याची पैशाची बचत सुद्धा झालेली आहे. आज मोठ्या प्रमाणात नवी उमेद फार्मर प्रोड्युसर कंपनी जिल्हास्तरावर काम करीत आहे. नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनी ली. वर्धा ची स्थापना – १७ जुलै २०१९ मध्ये झालेली असून ही संपूर्ण रित्या महिलांची कंपनी आहे व एकूण सदस्य संख्या – ३५०० इतकी असून सोयाबीन , तूर , चना खरेदी विक्री केंद्र हे उद्योगाचे स्वरूप आहे. अद्यापपर्यंत एकूण उत्पादन – ६०० MT तूर,चना , सोयाबीन खरेदी करण्यात आला असून एकूण उलाढाल – ४ कोटी ६० लाख एवढी आहे त्यानुसार निव्वळ एकूण नफा – ५ लाख आहे. सदर कंपनीचे व्यवस्थापन महिलांद्वारे करण्यात येत असून ही कंपनी वर्धा तालुक्यातील ६६ गावे समाविष्ट आहेत. ज्यात शेतकऱ्यांचे चना, तूर, सोयाबीन योग्य भावात खरेदी करून शेतकऱ्यांच्या पिकांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलबध करून देते. शेतकऱ्यांची सर्रास पने होणारी पिळवणूक टाळण्यासाठी सदर कंपनी सदैव कार्यरत असते. शेतकरी महीलापासून शेतमाल खरेदी केल्यानंतर त्यांना तात्काळ RTGS द्वारे रक्कम त्यांच्या खात्यात जमा केल्या जाते. खरेदी केंद्रावर शेतमाल आल्यानंतर शेतकऱ्यांकडून तोलाई, मापाई किंव्हा इतर जी काटछाट असते ती इथे कापल्या जात नाही. अभियानातून मिळालेले साहय्य – नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष वर्धा यांची विशेष मदत झाली आहे. ज्यात CAM, कृषी सखी, उद्योग सखी, CLF, इतर कॅडर शेतमाल खरेदी करण्यासाठी मदत करीत असतात. सुरवातीला नवी उमेद कंपनी चे काम करिता असताना महिलांना बऱ्याच अडचणीला समोर जावे लागले. शेतकरी त्याच्यावर विश्वास ठेवत नसत परंतु त्यांना वारंवार शेतकरी यांचा मार्गदर्शन करावे लागले. हा उद्योग स्थापन करणे करीता अभियानातून १५ लक्ष रुपयाचं निधी प्राप्त झाला होता. सध्या त्यांच्या मदतीने कंपनीस बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत १००० मेट्रिक टन क्षमता असलेल्या गोडवून व क्लिनिंग ग्रेडींग युनिट मंजूर झाले आहेत.या माध्यमातून गावातील गोर गरीब शेतकरी यांना याचा फायदा होणार आहे.

५. लखपती दिदी मोहीम : उमेद अभियाना अंतर्गत प्रत्येक महिलेला अभियानात समाविष्ट करण्यासाठी जिल्हा स्तरावरून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महिलांना गटात समाविष्ट करून त्यांची क्षमता बांधणी, आर्थिक समावेशन व उपजीविका कशी वाढविता येईल यावर गाव व तालुका स्तरावर विशेष गृह भेटी देऊन महिलांना बचत गटाचे महत्व समजावून सांगणे त्यांना गटात समाविष्ट करणे याकरिता गावस्तरावर समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या मार्फत गृह भेटी देऊन गट तयार करण्यात येत आहे. तसेच उमेद अभियानचे मुख्य उद्देशानुसार प्रत्येक महिला लखपती बनविण्याकरिता विशेष प्रयत्न जिल्हा स्तरावर करण्यात येत आहे त्याकरिता मा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या प्रयत्नातून जिल्हा स्तरावर कार्यरत सर्व कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याद्वारे लखपती सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यामधून प्रत्येक महिलेचे उपजीविकेचे साधन कोणकोणते आहे हे माहिती करून घेण्यात येत आहे. व अभियानाच्या माध्यमातून त्यांना कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे या सर्वेच्या माध्यमातून माहिती करून घेण्यात येत आहे. ज्या महिलेचे उत्पन्न एक लाखाच्या कमी आहे अश्या महिलांकरिता विविध स्तरावरून आर्थिक नियोजन कसे करता येईल याबाबत बँक लिंकेज, शासकीय विविध योजना व प्रभाग संघाचा निधी यांचा वापर करून त्यांची उपजीविका वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये कार्यशाळा, प्रशिक्षणे, अभ्यास सहली इतर बाबींचा विचार करून त्यांची शाश्वत उपजीविका कशी निर्माण करता येईल यावर काम करण्यात येत आहे.

६. प्रभाग विकास आराखडा : उमेद अभियाना अंतर्गत वर्धा जिल्ह्यात गावस्तरावर गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ, उत्पादक गट अशी स्वयं सहाय्यता गटाची रचना तयार करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण उमेद अभियानाचे आर्थिक, सामाजिक कामे गावस्तरावर चालू आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये काहीतरी वैशिष्टपूर्ण उत्पादने दिसून येत आहे त्या अनुषंगाने कारंजा – संत्रा, हिंगणघाट – टमाटर, समुद्रपूर – हळद, सेलू – भाजीपाला व दुग्धजन्य पदार्थ, वर्धा – टेराकोटा ज्वेलरी व सिलाई कामे, आर्वी – दुग्धजन्य पदार्थ, देवळी – बेकरी उत्पादने व शिलाई कामे, आष्टी – ………….. या तालुकांतर्गत प्रभाग निहाय हे विशेष वेगवेगळे उत्पादने दिसून येत आहे. प्रभाग विकास आराखडा अंतर्गत सामुहिकरित्या विशेष करून महिलांकरिता एकत्रितरित्या एखाद्या उत्पादनाचे सामुहिक दालन उपलब्ध करून देण्याकरिता प्रभाग विकास आराखडा (Cluster Development Plan) तयार करण्यात येत आहे. तालुका स्तरावरून विविध FPC तयार करण्यात आलेल्या आहे व त्यामध्ये सभासद जोडण्यात आलेले आहे. या सभासदांच्या मार्फत सभासद फी (Share capital) घेण्यात येत असून त्यांचा दहा टक्के निधी गोळा करण्यात येत आहे. त्या दहा टक्के निधीच्या माध्यमातून प्रकल्पाचा निधी भरून प्रकल्प कार्यान्वयित करण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, FPC यांच्या माध्यमातून विविध उत्पादनाचा विशेष प्रकल्प आराखडा व त्याचा DPR तयार करून DIC व समकक्ष शासकीय विभागांना सादर करण्यात येणार आहे. ज्यामुळे महिलांना विशेष दालन उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या उत्पादन ते विक्री या गोष्टींचा समावेश करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *